लाखो रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरटा फरार
| माणगाव | सलीम शेख |
माणगाव शहरासह तालुक्यात घरफोडीचे धाडसत्र सुरूच असून तालुक्यातील कशेणे गावातील घराच्या बंद खिडकीची जाळी कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम 10 हजार रुपये असा एकूण 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून तो फरार झाला आहे.सदरचा गुन्हा मंगळवार दि.12 जुलै 2022 रोजी रात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास घडला असून याबाबतची फिर्याद विमल सुरेश कोंडे (वय-56) रा.कशेणे ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याने फिर्यादी महिला विमल सुरेश कोंडे यांच्या राहत्या घराच्या बंद खिडकीची जाळी कोणत्यातरी हत्याराने तोडून तेथून घरात प्रवेश करून फिर्यादी यांच्या मालकीचे एक तीन तोळे 600 ग्राम वजनाचे दोन सरीचे काळ्या माली गुंफलेले गंथन त्यास दोन सोन्याचे डाव असे जुने वापरते किंमत अंदाजे 1 लाख 20 हजार रुपये,एक एम.आय कंपनीचा रेडमी गो मोबाईल निळ्या रंगाचा त्याचा आयमीआय नंबर 863982041694931 त्यामध्ये जिओ कंपनीचा सिम नंबर 8408069247 असा जुना वापरता किंमत अंदाजे 3 हजार 500 रुपये तसेच 500,200,100 रुपये दराच्या भारतीय चलनातील नोटा 10 हजार रुपये असा एकूण 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरटा फरार झाला आहे.
या गुन्ह्याची माहिती मिळताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील,गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.नावले,माणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.लहांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.197/2022 भादवि संहिता कलम 457,380 प्रमाणे करण्यात येऊन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मोहिते हे करीत आहेत.