वेश्वी गावात घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

परिसरात भीतीचे वातावरण

। उरण । वार्ताहर ।

थंडीची चाहूल लागताच उरण तालुक्यात चोरट्यांनी शिरकाव केला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत गुरुवारी (दि. 28) अज्ञात चोरट्यांनी वेश्वी गावातील चार रहिवाशांच्या घरातील बंद दरवाजाच्या कडी, खिडकी फोडून आत प्रवेश करुन कपाटातील अंदाजे सुमारे 25 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून घर मालकांनी याबाबत पोलिसांना फोन करुन माहिती दिली.

मागील वर्षी उरण तालुक्यात घरफोड्यांच्या घटनांत वाढ झाली होती. यावेळी पोलीस यंत्रणेला सहकार्य म्हणून रहिवाशांनी ‘जागते रहो’चा नारा दिला होता. तसेच काही संतप्त रहिवाशांनी चोरीच्या कामासाठी वापरण्यात येणारी गाडी ही जाळून टाकल्याची घटना घडली होती. त्यावेळी चोरट्यांनी पळ काढल्याने ते थोडक्यात अंधाराचा फायदा घेत बचावले होते. त्या घटनेला आज एक वर्षाचा कालावधी लोटतो तोच पुन्हा वाढत्या थंडीचा फायदा उठवत चोरट्यांनी आपला मोर्चा हा उरण तालुक्याकडे वळविला आहे. गुरुवारी (दि. 28) चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत वेश्वी गावातील प्रभाकर पाटील, शशिकांत मुंबईकर, हसुराम मुंबईकर, राज सागर मुंबईकर या चार रहिवाशांच्या बंद घरातील दरवाजाच्या कडी तसेच खिडकी फोडून घरात प्रवेश करुन कपाटातील अंदाजे सुमारे 25 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सदर चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

वेश्र्वी गावातील रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र, पुन्हा एकदा चोरट्यांनी उरण तालुक्यात शिरकाव केल्याने उरण तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच, याप्रकरणी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Exit mobile version