। म्हसळा । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्यातील आडी बंदर मोहल्यातील खलील उस्मान करवेकर यांच्या घरात इदच्या सणाचा स्वयंपाक चालू असताना अचानक सिलेंडरमधून आग सुरु झाली. हाहा म्हणता सिलिंडरने पेट घेतला.
संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असताना पुढे जाण्याचं धाडस कोणाचेही होत नसताना गावातील एक तरुण अ. अजीज युसूफ लोगडे (38) तरुणाने धाडस करून गोणत्याच्या सहाय्याने पेटत्या सिलेंडरला घराबाहेर फरफटत विहिरीपर्यंत ढकलत नेले. विहिरीजवळ जाताच सिलेंडरने जोरात पेट घेतला आणि क्षणात प्रचंड स्फोट झाला.
मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाही. केवळ अ. अजीज लोगडे आणि बिलाल अ. रहमान धनशे यांनी दाखविलेल्या धाडसामुळे फार मोठा अनर्थ टळला. आडी बंदर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या दोघांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली.