ड्रेनेजची फुटलेली पाईप लाईन सिव्हिलसाठी धोकादायक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या अक्षम्य हेलसांडपणामुळे अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्याच आवारात मोठया मोठया आजारांना निमंत्रण देणार्‍या दुर्गंधयुक्त सांडपाणी फुटलेल्या ड्रेनेजचे पाईप यामुळे आजाराचे निर्मिती केंद्रच बनले आहे. जिल्हा रुग्णालयाने याबाबत वारंवार लक्ष वेधून देखील त्याकडे जाणिवपुर्व दुर्लक्ष करण्याचेच काम बांधकाम विभागाचे अधिकारी करीत असल्याने जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, रायगड जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून गोरगरीब, आदिवासी बांधव व इतर रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांवर उपचार करुन चांगले आरोग्य देण्याची अपेक्षा असलेल्या रुग्णालयाचे आवारच इतके अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त आहे की या परिसरात आजाराचे निमुर्लन नव्हे तर आजाराला निमंत्रणच असल्याचे म्हटले तरी चुकीच ठरणार नाही.

जिल्हा रुग्णालयाच्या कोणत्याही कोपर्‍यात गेले असता याचे जागोजागी प्रत्यंतर येते. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या डाव्या बाजूला सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन तुटलेल्या अवस्थेत असल्याने सर्व सांडपाणी आवारात साचलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्यावर आजार पसरविणारे जिवाणूंची पैदास होऊन मोठया प्रमाणावर साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच परिस्थिती रुग्णालयाच्या सर्वच बाजूची आहे. उजव्या बाजूला असणार्या एक्सरे सेंटरच्या बाहेरदेखील भयानक अवस्था आहे. तिथे तर सांडपाण्याचे डबकेच तयार झालेले पहावयास मिळते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करुन याबाबत लक्ष वेधण्यात आले आहे. त्याचा सातत्याने पाठपुरावा देखील केला जातो. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला या महत्वपूर्ण समस्येकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याचे निदर्शनास येते.

अंतर्गत खराब रस्त्यांमुळे रुग्णांची हेळसांड
अपघाती विभागात अत्यवस्थ अवस्थेतील रुग्ण आल्यानंतर त्याच्यावर प्रथमोपचार करुन सर्व सोपस्कार पार पाडल्यावर पुढील उपचारासाठी अन्य विभगात दाखल केले जाते. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना स्ट्रेचर वरुन आवारातच असलेल्या इमारतीत हलविताना रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावरुन रुग्ण येजा करताना अक्षरशः व्हिवळत असताना पहायला मिळतात. रुग्णालयाच्या इतर भागातील सर्व रस्ते सिमेंटचे करण्यात आले आहेत. मात्र ऑक्सिजन प्लांट कार्यान्वीत असताना येणार्या अडचणींमुळे अपघात विभाग आणि नर्सिंग इमारत तसेच ओपीडी परिसरातील रस्त्याचे काम करता आले नव्हते. मात्र आता रुग्ण कमी असल्याने ऑक्सिजन प्लांटची रहदारी कमी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात या रस्त्याचे काम करता येणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक निधी देखील मंजूर आहे. कृषीवलने यासंदर्भात एप्रिलमध्ये कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांच्या सदर बाब निदर्शनास आणून दिले होते. त्यावर उर्वरित रस्त्याच्या कामाबाबत माहिती घेऊन योग्य त्या उपाययोजना त्वरीत करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे सुखदेवे यांनी सांगितले होते. तथापि पावसाहा संपण्याची वेळ आली तरी हा 50 मीटरचा छोटासा रस्ता बांधकाम विभाग करु शकलेले नाही.

जिल्हा रुग्णालयातील दुरुस्तीचे काम वेळोवेळी करण्यात येते. ड्रेनेज सिस्टीमच्या कामाची पाहणी करुन तात्काळ कार्यवाही केली जाईल. अंतर्गत रस्त्याच्या कामाला नव्याने मंजुरी द्यावी लागणार असून लवकरच मंजूरी घेऊन पावसाळा संपताच रस्त्याचे काम करण्यात येईल.


जगदिश सुखदेवे
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
Exit mobile version