पाताळगंगा पुलावर बस-कारचा अपघात

एमआयडीसीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये संताप
। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर आहे. या परिसरात वाढती कारखानदारी आणि लोकसंख्या पाहता रहदारीसाठी पाताळगंगा नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी नादुरूस्त असल्याने बंद आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या नवीन पुलावरुन वाहतूक सुरू आहे. या पुलावरील लोखंडी शिगांनी डोके वर काढले आहे. एकाच पुलावरून वाहतूक सुरू असल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झालेली आहे. पातळगंगा नदीच्या पुलावर समोरून येणार्‍या बस व कारची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की बस व कार यांच्या धडकेत कार पलटी झाली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, बस क्लीनर किरकोळ जखमी झाला, तर कार चालकसुद्धा सुखरूप असल्याचे समजत असून, कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे चित्र दिसत आहे. पाताळगंगा पुलाच्या समस्याबाबत एमआयडीसी प्रशासनाला वेळोवेळी मागणी करूनही जुन्या पुलाची दुरुस्ती केली जात नाही. एकेरी वाहतूक असल्यानेच असे अपघात घडत आहेत.

एमआयडीसी प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने पाताळगंगा पुलावार अपघात होऊन जीवितहानी झाल्यास पोलिसांनी एमआयडीसी अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

Exit mobile version