बस कारला घासल्याचा राग अनावर

अज्ञाताने कारचालकावर रोखली रिव्हॉल्व्हर
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सिनेमात पाहावे असे चित्तथरारक दृश्य अनेकांना प्रत्यक्षात शनिवारी पहावयास मिळालं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिला की नाही, असा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित झाला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिनेमा स्टाईल थरार पहावयास मिळाला. वडखळ ब्रिजवर कंपनीच्या बस चालकावर अज्ञातांनी बंदूक रोखली असल्याचा व्हिडीओ वार्‍याच्या वेगाने व्हायरल झाला. आणि घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली.

वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी या थरारक घटनेची माहिती दिली. एक कार आणि जेएसडब्ल्यू बस चालक या दोघांमध्ये पेणमध्ये वाहनांची एकमेकांना घासाघास झाली. यावर संतप्त कारचालकांनी बस चालकांना थांबण्यास सांगितले. मात्र, बस चालक न थांबता पुढे निघून जात होता, तर कारदेखील वेगाने पाठलाग करीत होती. वडखळ येथे आले असता कार बसच्या आडवी लावून अज्ञात दोघेजण उतरून बसमध्ये चढले, शिवीगाळ करीत बसचालकावर रिव्हॉल्व्हर रोखली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली.

हा चित्तथरारक पाठलाग पाहून बसमधील प्रवासी जीव मुठीत घेऊन होते, तर वाहनचालक ही चांगलाच भेदरला असावा. पाठलाग करणारी कार बसच्या समोर उभी राहिली, दोघे हट्टेखट्टे पुरुष या थांबलेल्या बसमध्ये चढले, त्यांचा राग व संताप अनावर झाल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसून येतोय. शिव्यांची लाखोली व रिव्हॉल्व्हर बस चालकाच्या रोखल्यानंतर सार्‍यांच्याच काळजात चरर्र व्हावं असं दृश्य. काही तरी मोठं घडणार याचा सर्वांना अंदाज आलाच. जीव मुठीत घेऊन बसमधील प्रवासी मूग गिळून गप्प राहिले, अन्यथा दुसरा पर्यायही नसावा, अशी घटना जी वार्‍यासारखी जिल्ह्यात व महाराष्ट्रात पसरली. वाहनचालकांचा वाद अशाप्रकारे विकोपाला जाईल ही घटना सर्वानाच धक्का देऊन गेली. मात्र, सुदैवाने घातपात झाला नाही, याचेच अनेकजण समाधान व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version