थरकाप उडवणारी घटना! कुर्ल्यात बसने अनेकांना चिरडले; सहा जणांचा नाहक बळी

45 हून अधिक लोक जखमी

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात सोमवारी (दि.09) रात्री एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. भरधाव वेगातील बेस्टच्या बसने अनेक वाहनांना धडक देत अनेक पादचाऱ्यांनादेखील चिरडले आहे. या भीषण अपघातात आत्तापर्यंत सहा जण ठार झाले असून 45 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

कुर्ला-अंधेरी मार्गावर धावणाऱ्या बेस्टच्या बसने एल वॉर्ड ऑफिसपुढे असलेल्या व्हाइट हाऊस बिल्डिंगजवळ अनेकांना चिरडले. अनेक वाहनांना तसेच रस्त्यावरुन चालणाऱ्या अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. अपघाताच्या वेळी बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास झाला असून यात आतापर्यंत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 45 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर भाभा रुग्णालय, सिटी हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स रुग्णालय, हबीब रुग्णालय, सायन हॉस्पिटल, फौझिया रुग्णालय, कुर्ला नर्सिंग होम अशा विविध ठिकाणी उपचार सुरू असून जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी बस चालक संजय मोरे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अपघातातील मृतांची नावे
बेस्ट बसच्या या भीषण अपघातातील मृतांची ओळख पटली असून कनीस अन्सारी (55), आफरीन शाह (19), अनम शेख (20), शिवम कश्यप (18), विजय गायकवाड (70), फारूख चौधरी (54) अशी मृतांची नावे आहेत.
आज कुर्ल्यातील बेस्ट बसस्थानक बंद
कुर्ल्यातील बेस्ट बसच्या भीषण अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून विद्यार्थी, नोकरदार यांचे हाल होत आहेत.
Exit mobile version