| महाड | वार्ताहर |
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडचे दर्शन घेऊन पुणे येथे निघालेल्या खाजगी बसचा रायगड-महाड रोडवरील घरोशी वाडी येथे अपघात झाला आहे. बस वेगात असताना अचानक उलटली. या बसमध्ये 32 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 11 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.20) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
किल्ले रायगडवर पावसाळी पर्यटन करून पुण्याकडे परतणाऱ्या खाजगी आराम बस या गाडीचा महाडच्या हद्दीवर घरोशी वाडी येथे दुपारी चारच्या सुमारास मोठा अपघात घडला. बसमधून प्रवास करणाऱ्या 32 प्रवाशांपैकी 11 जण जखमी झाल्याची माहिती पाचाड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. या अपघाताचे वृत्त समजतात महाड तालुका पोलीस स्टेशन आणि पाचाड दूर क्षेत्र स्थानकातील पोलीस स्टेशनच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांना तातडीने प्राथमिक केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले. या अपघातात अनिकेत आघाव (22), किरण घाविल (29), आशिष अंभोरे (24), तुकाराम चोपडे (20), भीमा कांबळे (21), तुळशीराम यादव (19), शिवानी जाधव (23), जानवी पारकर (24), माधुरी ठोकळ (20), दिव्या अहिल्या (29), तेजस पाटील आदी प्रवासी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.







