| तळा | प्रतिनिधी |
तळा बसस्थानकात सध्या सुरू असलेले शौचालयाचे काम हे कासव गतीने सुरू असून, कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कित्येक वर्षांपासून रखडलेल्या तळा बसस्थानकाच्या कामाला मंजुरी मिळून 14 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु, आठ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर बसस्थानकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. संरक्षक भिंत, बसस्थानकासमोरील काँक्रीटीकरण, शौचालय व त्यावरती चालक वाहकासाठी विश्रांती खोली, असे या कामाचे स्वरूप होते. त्यापैकी काँक्रीटीकरण व संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले आह. परंतु, शौचालय व त्यावरती बांधण्यात येत असलेल्या विश्रांती खोलीचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून कित्येक महिने उलटूनही संबंधित ठेकेदाराला हे काम पूर्ण करता आलेले नाही. तालुक्याचे बसस्थानक असल्याने याठिकाणी ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी वर्दळ असते, मात्र शौचालयाचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांसह महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.







