बसथांब्यांसमोर वाहनांची पार्किंग; प्रवाशांना बस पकडताना त्रास
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेने शहरात विविध ठिकाणी आधुनिक बसथांबे उभारले आहेत. सिडको वसाहतींमध्येही मोठ्या प्रमाणात हे बसथांबे आहेत. मात्र, या बसथांब्यांचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून येत आहे.
काही वाहन चालक बसथांब्यांसमोरच आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करून जातात. त्यामुळे बसथांबे वाहनांच्या गर्दीत अडकून पडले आहेत. यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. बस आल्यावर प्रवाशांना वाहनांच्या मध्ये जाऊन बस पकडावी लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. बसथांब्यावर नीट उभे राहण्यासाठीही जागा राहात नाही. स्थानिक नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली असून, बसथांब्यांसमोर पार्किंग बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे. पालिकेने याकडे लक्ष देऊन बसथांबे प्रवाशांसाठी मोकळे आणि सुरक्षित करणे आवश्यक आहे.
बसथांब्यांच्या समोर ‘नो पार्किंग’ची कडक अंमलबजावणी करावी, तसेच वाहतूक पोलिसांनी नियमित पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी प्रशासनाला विनंती आहे.
अमोल शितोळे,
अध्यक्ष, कामोठे शहर शेतकरी कामगार पक्ष







