| ठाणे | प्रतिनिधी |
मोठ्या बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करून प्रकल्प वर्षभरात पूर्ण न झाल्यास गुंतवणूक रक्कमेवर प्रतिवर्षाला 18 टक्के व्याज आणि बांधकाम प्रकल्पात झालेल्या नफ्यातून अतिरिक्त रक्कम देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील उद्योजकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. मुंबईतील उद्योजकाला चार कोटींचा गंडा घातल्याचा गुन्हा ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. चार कोटींचा गंडा घालणारा संशयित आरोपी आणि तक्रारदार उद्योजक हे अनेक वर्षापासून परिचयाचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी 2016 ते 14 जून 2024 दरम्यान फसवणूक करणारा संशयित आरोपी याने तक्रारदाराच्या ठाण्यातील मुलुंड चेकनाका येथे ऑफीसला जाऊन त्यांना त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीत ठाणे आणि मुंबई येथील प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यावेळी संशयित आरोपीनं तक्रारदारांना बांधकामात होणाऱ्या फायद्याची रक्कम देतो तसेच प्रकल्प वर्षभरात पूर्ण न झाल्यास गुंतवणूक रक्कमेवर प्रति वर्षी 18 टक्के व्याज देतो असे सांगितले. अशा प्रकारे 4 कोटींची गुंतवणूक झाल्यानंतर एका वर्षानंतर आरोपीने गुंतवणूकदारांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. जमा केलेला पैसे हा स्वतःच्या फायद्यासाठी वापरून गुंतवणूकदार उद्योजकाची फसवणूक केली. या प्रकरणी ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या फसवणुकीच्या प्रकारासोबत आरोपीने आणखी काही व्यावसायिकांची फसवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांनी अशी फसवणूक झाली असल्यास ठाणे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.






