| मुंबई | प्रतिनिधी |
एका व्यावसायिकाने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. मंगळवारी (दि.16) मध्यरात्री ही घटना घडली आहे. अमित शांतीलाल चोप्रा असे या व्यावयासिकाचे नाव आहे. व्यावसायिक कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक अमित चोप्रा (47) यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. चोप्रा हे मुळचे राजस्थान येथील रहिवासी असून, त्याचे सर्व नातेवाईक तेथे वास्तव्याला आहेत. चोप्रा पत्नी व मुलांसोबत मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे राहत होते. त्यांचा मुंबईतच इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. अमित चोप्रा हे मंगळवारी मध्यरात्री टॅक्सीने जात होते. त्यांची टॅक्सी वांद्रे-वरळी सीलिंकवर येताच त्यांनी साप सावल्याचा आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरून टॅक्सी चालकाने टॅक्सी बाजूला थांबवली. त्यानंतर चोप्रा यांनी टॅक्सीचा दरवाजा उघडला व त्यांनी सीलिंकवरून समुद्रात उडी मारत आत्महत्या केली. या प्रकारामुळे टॅक्सी चालक घाबरला व त्याने तात्काळ हा प्रकार सीलिंक कर्मचारी व पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अमित यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना त्यांच्याकडे कोणतीही चिठ्ठी सापडली नाही, त्यामुळे कुटुंबियांकडे चौकशी केल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी अधिकच्या तपासाला सुरुवात केली आहे.







