व्यापार्‍यांचा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना घेराव

। देवरुख । वृत्तसंस्था ।
कंटेन्मेंट झोन आणि बाजारपेठेत अनिश्‍चित काळासाठी बंद याविरोधात संतप्त झालेल्या व्यापार्‍यांनी संगमेश्‍वर बाजारपेठेजवळ आलेले तहसीलदार सुहास थोरात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना मुंबई गोवा महामार्गावरील सोनवी चौक येथे मंगळवारी घेराव घातला.

जिल्हाधिकारी यांनी संगमेश्‍वर तालुक्यातील पाच गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर संगमेश्‍वर बाजारपेठेतील व्यापारी संतप्त झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतरही बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. याउलट अधिकच नियम कडक करण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत.

मंगळवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आणि तहसीलदार सुहास थोरात संगमेश्‍वरात बुरंबी येथे कोव्हिड विलगीकरण कक्षाच्या उद्घनासाठी येणार असल्याची माहिती व्यापार्‍यांना मिळाली़ संगमेश्‍वर बाजारपेठेतील व्यापारी संगमेश्‍वर सोनवी चौक येथे एकत्र आले आणि त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी व्यापारी सुशांत कोळवणकर यांनी व्यापार्‍यांची होणारी फरफट आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक याबाबत सांगितले. यावेळी बोलताना फारूक पठाण म्हणाले की, संगमेश्‍वर बाजारपेठेतील व्यापारी संयमी आहेत. मात्र, आता संयमाचा अंत झाला आहे. बुधवारपर्यंत निर्णय द्या,नाहीतर गुरुवारपासून दुकाने उघडतो,असे सांगितले. यावेळी व्यापारी संघाचे सचिव अनिल भिडे म्हणाले की,संगमेश्‍वर बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी कधीही आंदोलन केले नाही. मात्र, आंदोलन करण्यास भाग पाडू नका,असे सांगितले.

Exit mobile version