पेणमध्ये कारागिरांची रात्रंदिवस धावपळ; कापडी सजावटीच्या गणेशमूर्तींना यंदा विशेष मागणी
| म्हसळा | गणेश म्हाप्रळकर |
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने रायगड जिल्ह्यातील बाप्पाचे माहेरघर असलेल्या पेणमध्ये गणेशमूर्तींच्या चित्रशाळांमध्ये अक्षरशः लगबग सुरू झाली आहे. कुठे बाप्पांच्या डोळ्यांना अंतिम रूप दिलं जातंय, कुठे रंगकामाची लगबग सुरू आहे, तर कुठे आकर्षक वस्त्रालंकार आणि कापडी सजावटीने गणरायाचं रूप खुलवलं जातंय. भक्तांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी पेणच्या गणरायाची ही मूर्ती आता शेवटचा साज चढवत आहे.
पेणच्या गणेशमूर्तींची खरी ओळख आहे ती कारागिरांच्या हातातील बारकावे आणि कलाकुसर. बाप्पांच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांची रचना, मुकुटावरील नक्षीकाम, वस्त्रालंकार आणि रंगसंगती यामुळे प्रत्येक मूर्तीला एक वेगळे रूप प्राप्त होते. यंदा विशेषतः कापडी सजावट केलेल्या गणेशमूर्तींना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत.
पेणमध्ये सध्या सुमारे 550 चित्रशाळांमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. या चित्रशाळांमध्ये हजारो महिला, पुरुष आणि तरुण मूर्ती घडविण्यापासून रंगकाम, नक्षीकाम, सजावट आणि अंतिम रूप देण्यापर्यंत विविध कामांमध्ये व्यस्त आहेत. यंदा टिटवाळा, चौरंग, शिवरेकर यांसारख्या विविध प्रकारच्या गणेशमूर्तींना मोठी पसंती मिळत आहे. घरगुती गणेशोत्सवापासून सार्वजनिक मंडळांपर्यंत आपल्या आवडीच्या बाप्पाची निवड करण्यासाठी भक्त पेणमध्ये दाखल होत आहेत.
पेणच्या गणेशमूर्तींना भौगोलिक मानांकन मिळाले असल्याने या कलेला वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली मूर्तीकलेची परंपरा आजही इथल्या कारागिरांनी जपली आहे. बदलत्या काळानुसार मूर्तींच्या आकारात, रंगसंगतीत आणि सजावटीत नवनवीन प्रयोग केले जात असले, तरी बाप्पांच्या डोळ्यांना जिवंतपणा देण्याची पेणच्या कारागिरांची खासियत आजही कायम आहे.
30 लाख मूर्तींची विक्री
गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून जगभर ओळख असलेल्या पेणमध्ये यंदाही गणेशमूर्तींच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 30 लाखांहून अधिक गणेशमूर्तींची विक्री झाल्याचे सांगण्यात येत असून, यंदाच्या गणेशोत्सवात 100 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. पेणमध्ये तयार होणाऱ्या आकर्षक आणि सुबक मूर्तींना महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातूनही मागणी असते.
