। तळा । वार्ताहर ।
श्री गणेशाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असल्याने रंगकाम करून झालेल्या मूर्तींना हिर्या, मोत्यांचा साज चढविण्यात कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. यंदा 7 सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होत असल्याने गणेशोत्सवासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामध्ये कारागिरांची कमतरता, वारंवार वीज पुरवठा खंडित होणे अशा समस्या कारखानदारांना सतावत असल्याने मूर्त्यांची ऑर्डर पूर्ण करण्याच काम दिवस रात्र सुरू आहे.
पूर्वी रंगकाम पूर्ण झाल्यावर मूर्ती विक्रीसाठी सज्ज असत, मात्र गेल्या काही वर्षांपासून हिरे, मोती लावून देण्यासाठी मागणी वाढल्याने कारखानदार कारागिरांना 500 ते 700 रूपये मजुरी देऊन मूर्त्यांना हिरे, मोती, झिंग लावून आकर्षक बनविण्याचे काम पूर्ण करून घेत आहेत. हल्ली बाप्पांना विविध रुपात आणण्याच फॅड आले आहे. श्री राम, जय मल्हार, विठ्ठल, शिवशंकर आदी रुपांमधील गणेश मूर्तींना मागणी वाढल्याने त्या रुपाला साजेशी कलाकृती करण्यास वेळ लागतो. त्यामुळे कारखानदारांकडून तीन महिन्यापासूनच कारखान्यात मूर्तीचे काम सुरू असून या सर्व मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गणेशोत्सवाला अगदी काही दिवसच शिल्लक राहिले असल्याने या मूर्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.