| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात चार ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून, चार जागा बिनविरोध झाल्याने अवघ्या दोन जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोतवाल खल्लाटी, दहिवलीतर्फे वरेडी, गौरकामत आंभेरपाडा, या चार ग्रामपंचायतीमधील सहा जागा रिक्त झाल्या होत्या. त्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोट नामांकन अर्ज दाखल करण्याचे मुदतीत चार जागांवर केवळ एक नामांकन अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघार घेण्याच्या मुदतीनंतर एकमेव अर्ज कायम राहिला. त्यामुळे दहिवली तर्फे वरेडी, अंभेरपाडा, गौरकमत आणि पालीतर्फे कोतवाल खल्लाटी या चार ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. आंभेरपाडामध्ये गोराबाई सुनील काठे या अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर तर शिवाजी मालू मिसाळ हे दहिवलीतर्फे वरेडीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागेवर बिनविरोध निवडून आले. तर गौरकामत मध्ये सुमन बंडू वाघमारे या अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर आणि दीक्षा देविदास देशमुख या पालीतर्फे कोतवाल खल्लाटी या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आले. मात्र, पालीतर्फे कोतवाल खल्लाटी आणि गौरकामत येथील एका जागेसाठी एकाहून अधिक उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होत आहे. पाली तर्फे कोतवाल खल्लाटी मधील एका सर्वसाधारण जागेसाठी आशिष सुरेश देशमुख आणि मयूर समीर देशमुख यांच्यात सरळ लढत होणार आहे. तर गौरकामत ग्रामपंचायतीमधील एका जागेसाठी होत असलेल्या पोट निवडणुकीत सर्वसाधारण महिला जागेसाठी स्नेहा स्वप्नील देशमुख आणि श्रुती समीर दळवी यांच्यात सरळ लढत होत आहे. 28 एप्रिल रोजी या दोन्ही जागांसाठी पोट निवडणुक होणार असून 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.







