आमदारांच्या कृपेने वायशेत गेले खड्ड्यात

करोडो रुपयांचा निधी गेला कुठे; नागरिकांचा संतप्त सवाल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग-मुरुड-रोहा मतदार संघाचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी हे आपल्या हाकेच्या अंतरावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत निष्क्रिय ठरले असून सध्या सोशल मिडियावर वायशेत रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांची चर्चा रंगली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडियोमध्ये तरुणाने वायशेत गावाला महाराष्ट्र राज्याचा आदर्श गाव पुरस्कार मिळाला असल्याचे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, व्हिडियो पाहिल्यानंतर आमदार साहेब रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना राबवित असल्याचेच समोर आले आहे.

फुकटचं श्रेय घेण्यातच कायम धन्यता मानणाऱ्या आमदार साहेबांनी निदान हाकेच्या अंतरावरील रस्त्यांची दुरस्ती करणे नागरिकांना अपेक्षित होते. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. आमदारांच्या गावातील वायशेतमधील रस्ता पुर्णतः खड्ड्यात गेला आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांसह स्थानिकांची प्रचंड हाल होत आहे. येथील नागरिक दुर्लक्षीत असल्याचे समोर आले आहे.

अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदार संघामध्ये अडीच वर्षात करोडो रुपयांचा निधी विकासासाठी आणल्याचा कांगावा स्थानिक आमदार दळवी यांनी केला. मात्र, घराजवळचा रस्ता करण्यात ते असमर्थ ठरले असून त्यांनी आणलेला हा निधी नेमका गेला कुठे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वायशेत येथील सायमन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला व परिसरात शंभरहून अधिक घरे आहेत. या घरांच्या हाकेच्या अंतरावरच धनदांडग्यांची कॉरी आहे. अवजड वाहनांमार्फत दगड, खडीची वाहतुक याच रस्त्यावरून होते. सुमारे एक किलो मीटरचा हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खड्डयात आहे. पावसाळ्यात या खड्डयातून प्रवास करणे धोकादायक बनत आहे. अवजड वाहनांमुळे हा रस्ता खराब झाल्याची माहिती समोर आली आहे.

उन्हाळ्यात रस्त्यावरील धुळीचा आणि पावसाळ्यात खड्ड्यांसह चिखलाचा त्रास नागरिकांना होत आहे. रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे धोकादायक होऊ लागले आहे. पादचाऱ्यांनादेखील त्याचा नाहक त्रास होत आहे. अनेक वेळा गुडघाभर पाण्यात्ूान ये-जा करण्याची वेळ पादचाऱ्यांवर येतो. याच मार्गावरून शाळकरी मुलेदेखील जातात. त्यांनादेखील या खड्डेमय रस्त्याचा प्रचंड त्रास होत आहे. शिंदे गटातील आमदार दळवी यांच्या मतदार संघातील वायशेत गाव आहे. मतदार संघासाठी करोडो रुपयांचा निधी आणला असून गावागावात विकासाची गंगा पोहचविण्याचे काम केल्याच्या बाता आमदार कायमच मारत आले आहेत. मग हा निधी नागरिकांसाठी होता, कि स्वतःच्या फायद्यासाठी होता? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अधिकाऱ्यांवर दळवींचा दबाव?
सोशल मिडियावर वायशेत गावातील रस्त्याचा व्हिडियो चांगलाच व्हायरल होत आहे. त्याबाबत बांधकाम अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर रस्त्याची परिस्थिती सांगितली. निधीच उपलब्ध नसल्याने रस्त्याचे काम रखडले असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार साहेबांच्या भीतीमुळे अनेक अधिकारी गैरकामांकडे दुर्लक्ष करीत असून आमदारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धाकात ठेवले असल्याचे यावरुन स्पष्ट होते.

या रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड आहे. त्यामुळे हा रस्ता खराब झाला आहे. डांबरीकरण करूनदेखील रस्ता खड्ड्यात जाण्याची भिती आहे. या रस्त्यासाठी करोडो रुपयांचा निधी आवश्यक आहे. काँक्रीटीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यास रस्ता तयार केला जाईल.

बांधकाम अधिकारी,  जिल्हा परिषद
Exit mobile version