मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाचे गेली अनेक वर्षांपासून कोकणवासियांचे दुखणे कायमच राहिले आहे. या मार्गाची दुरवस्था झाली असून, पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील अनेक भागांत महामार्ग उखडला गेला आहे. त्यामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांतील खडी बाहेर निघाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना या मार्गाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा या कोकण महामार्गाची पाहणी दौरा केला. गणेशभक्तांना यंदाचे वर्षी प्रवास सुखकर व्हावा यासाठी सिंगल लेन पूर्ण करण्याची हमी दिली असून, गणेशभक्तांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. मात्र, माणगाव व इंदापूर येथील बायपासचे काम अपूर्ण असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना या शहरात वाहतूक कोंडीशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कोकणच्या प्रवासाला बायपासचे विघ्न कायमच राहणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा ना. चव्हाण यांनी केला. त्यावेळी संबंधित अधिकारी, ठेकेदारांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या महामार्गाचे सिंगल लेन गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याचे, तर डिसेंबरपर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आम्ही प्रयत्न करतो आहे की, गणेशोत्सवापर्यंत गोवा महामार्गावरील सिंगल लेनचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल. पनवेलपासून असणारा गोवा महामार्ग सुस्थितीत आहे. पनवेल ते कासु या 42 कि.मी.च्या पहिल्या टप्प्यातील 12 कि.मी. अंतराच्या सिगल सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे. उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेल्टर लावून काम करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. कासुपासून दुसऱ्या टप्प्याचे काम नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून करण्यात येणार आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने एकाच गाडीच्या माध्यमातून एका दिवसात अर्धा किलोमीटरचा रस्ता बनवण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला वेग मिळणार आहे. अशा नवीन टेक्नॉलॉजीच्या गाड्यांची संख्या वाढून काम करण्याचे नियोजन आहे.
गणेशोत्सवापर्यंत एका लेनचे काम पूर्ण होईल, असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. तर, डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर व माणगाव बाजारपेठ तळ कोकणाकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. आणि हा मार्ग शहरात अरुंद असल्याने वाहतूक कोंडी सतत होत असते. त्यामुळे 8 ते 10 कि.मी. शहराच्या दोन्ही बाजूनी वाहनाच्या रांगा लागत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका कोकणवासियांना प्रवासादरम्यान बसतो. या बायपासचे काम गणेशोत्सवापूर्वी झाले असते तर, वाहतूक कोंडीचे कायमचे दुखणे निघाले असते, अशी चर्चा प्रवाशातून होत असून, या महामार्गाचे गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन चालू झाले तरी इंदापूर व माणगावात वाहतूक कोंडीचा फटका गणेशभक्तांना सहन करावा लागणार आहे.