| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे विजयी झाले आहेत. त्यामुळे ते आता भारताचे 17 वे उपराष्ट्रपती ठरले आहेत. त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांना पराभूत केलं आहे. उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सी.पी.राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीचे 452 मतं मिळाली. तर बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 300 मतं मिळाली.
भारतीय संसदेत लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण 788 खासदार आहेत. सध्या दोन्ही सभागृहात 7 जागा रिक्त आहेत. अशाप्रकारे, एकूण 781 खासदारांना मतदान करायचे होते, त्यापैकी 13 जणांनी मतदानात भाग घेतला नाही. यामध्ये बीआरएसचे 4, बीजेडीचे 7, अकाली दलाचे 1 आणि 1 अपक्ष खासदाराने मतदान केले नाही. तर 427 एनडीए खासदारांनी मतदान केले. या निवडणुकीत एकूण 768 खासदारांकडून मतदान झाले. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान मंगळवारी सकाळी 10 वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी 5 वाजता संपले. मतदान संपल्यानंतर, काँग्रेसने सांगितले की उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षात एकजूट राहिली. सर्व 315 खासदारांनी मतदान केले आहे.
सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती
