मुंबई | प्रतिनिधी |
आगामी काळात पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून करु, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने सोमवारी (27 सप्टेंबर) आयोजित केलेल्या कार्यक्रमात ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
यावेळी राज्याच्या पर्यटन विभागाला काहीही कमी पडू देणार नाही. राज्य सरकार आणि राज्याचं अर्थखातं त्यांच्या पाठीशी आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा लवकर सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक त्या रेल्वे किंवा विमानात घेऊ. पण थोरात साहेब आपल्यावर जबाबदारी असेल की या प्रवासाच्या काळात आपल्याला बैठक संपवावी लागेल. कारण आता जग वेगवान आहे. आपण तिथं पोहचून परती प्रवास सुरू झाला तरी आपली कॅबिनेट संपली नाही तर पंचायत होईल. आपण हे आव्हान घेतलं पाहिजे. डेक्कन ओडीसीमध्ये कॅबिनेट नक्की करणार आहोत.