शासनाकडून आजच जीआर निघणार
| मुंबई | प्रतिनिधी |
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. यानंतर आज (दि. 3) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी समाजासाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसींच्या प्रश्नाबाबत एका उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (दि.3) राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. ओबीसींच्या प्रश्नाबाबत उपसमितीमध्ये सहा मंत्री असतील. ही उपसमिती ओबीसी समाजच्या प्रश्नांसंदर्भात ही उपाययोजना सुचवण्याचे काम करणार आहे.
ओबीसींच्या प्रश्नाबाबत एका उपसमितीची स्थापना करण्या निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या समितीमध्ये सहा जणांचा समावेश असेल. यामध्ये प्रत्येक पक्षाचे दोन मंत्री असतील. ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी ही समिती काम करेल. अनेक दिवसांपासून अशी समिती स्थापन करावी, असा सरकारचा विचार होता.ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आजच गठीत होणार. आजच जीआर काढण्यात आला आहे, अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
* संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1 हजार रुपयांची वाढ.
* लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार.
* महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित.
* महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा.
* कारखाने अधिनियम, 1948 मध्ये सुधारणा.
* मुंबईतील आणिक डेपो- वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका- 11 प्रकल्पास मान्यता. 23 हजार 487 कोटी 51 लाख रुपयांची तरतूद
* मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुल बांधकामाच्या खर्चास मान्यता प्रकल्पासाठी 3 हजार 750 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता.
* ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका – 2, मार्गिका – 4 तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता
* पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजूरी : स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व बिबवेवाडी ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे 421मीटरने स्थलांतरण करण्यास व यासाठीच्या 683 कोटी 11 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता.
* मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-3 (MUTP-3) व 3अ (MUTP-3A) प्रकल्पातील लोकल (उपनगरीय रेल्वे) गाड्यांच्या खरेदीसाठी कर्जास मान्यता बाह्य सहाय्यित कर्ज घेण्याऐवजी पूर्णतः रेल्वे व राज्य शासनाच्या निधीतून सहाय्य देण्यास, तसेच त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने 50% आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.
* मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP- 3B) या प्रकल्पातील राज्य शासनाच्या 50 टक्के आर्थिक सहभागास मान्यता
* पुणे ते लोणावळा लोकल (उपनगरीय रेल्वे) च्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिका प्रकल्प खर्चाची तरतूद करणार.
* ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग सिडको महामंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक-खाजगी-भागीदारी अंतर्गत BOT तत्त्वावर राबविण्यात येणार
* “नवीन नागपूर” अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करणार : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मौजा गोधणी (रिठी) व मौजा लाडगांव (रिठी), तालुका हिंगणा जि. नागपूर येथील एकूण अंदाजे क्षेत्र 692.06 हे. आर. जागा संपादित करून सार्वजनिक हितार्थ “नविन नागपूर” अंतर्गत ‘आयबीएफसी’ विकसित करण्याचा प्रकल्प राबविण्यास तत्वत: मान्यता.
* नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता (व त्यालगत चार वाहतूक बेटांची निर्मिती : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता व त्यालगत ४ वाहतूक बेट विकसित करणार.
* अनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार.







