ई-रिक्षा, क्ले पेव्हर रस्त्यांसाठी मोर्चा
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये ई-रिक्षा आणि क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मोर्चाचे आयोजन केले आहे. सकाळी दहा वाजता श्रीराम मंदिर चौक येथून अधीक्षक कार्यालय येथपर्यंत मोर्चा काढून निवेदन दिले जाणार आहे. यादरम्यान ‘माथेरान बंद’ची हाक माथेरान पर्यावरण संवेदनशील नागरिक मंचाकडून देण्यात आली आहे, अशी माहिती मंचाचे कार्यकर्ते मनोज खेडकर यांनी दिली.
याबाबत नियोजन करण्यासाठी हॉटेल गुजरात भवन येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेनंतर माथेरानमधील अधीक्षक (तहसीलदार) व पोलीस प्रशासन यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या दि.12 मे 2022 च्या आदेशानुसार नगरपालिकेच्या हद्दीत ई-रिक्षा चालू करण्यासाठी फेजीब्लिटी तपासून ही सेवा माथेरान शहरात चालू करण्याकरिता राज्य शासनाने काय पावले उचलली याचा अहवाल सादर करायचा होता. या आदेशात चालू केलेली ई-रिक्षा सेवा बंद करण्याचा वा स्थगित करण्याचा कुठेही उल्लेख नसल्याने प्रशासनाने या आदेशाचा योग्य अर्थ लावावा तसेच सनियंत्रण समितीच्या परवानगीने धूळविरहित रस्ते करण्याकरिता क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविणे काम माथेरानमध्ये सुरू आहे. दि.24 फेब्रुवारीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने क्ले पेव्हर ब्लॉक वापरास स्थगिती देण्यात आली आहे. या आदेशात माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील सनियंत्रण समितीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
माथेरानमधील रस्त्यांमुळे मागील 150 वर्षांपासून जमिनीची धूप होऊन पर्यावरणाचा र्हास होत आहे. हे लक्षात घेता मातीचे रस्ते न बनविता क्ले पेव्हर ब्लॉकचा पर्याय सनियंत्रण समितीने दिला आहे. माथेरानमध्ये पडणारा 250 इंच पाऊस लक्षात घेता हा पर्याय योग्य आहे. रस्ते बनविण्याकरिता मागील 150 वर्षे जंगलातील हजारो टन माती व दगड वापरले गेलेत. हे दुष्टचक्र थांबविण्याकरिता सनियंत्रण समितीने क्ले पेव्हर ब्लॉक लावण्याच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्याकरिता तात्काळ अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव, हॉकर्स युनियन अध्यक्ष संतोष कदम, प्रदीप घावरे, नारायण कदम, मुर्तुजा ताहेर, अनंत शेलार, ज्ञानेश्वर बागडे, संदीप शिंदे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.