शेततळे योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याची शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकर्‍यांकडे असावी लागते. त्यामुळे कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे तेव्हा या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन मुरुड तालुका कृषि अधिकारी मनिषा भुजबळ यांनी केले आहे. या शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन फळबाग, भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकर्‍यांना सहज शक्य होते.

अर्जदार शेतकर्‍याकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. शेतकर्‍याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी शासकीय योजनेतून शेततळे या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.जमीनीचा सात-बारा आणि 8-अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र आणि जातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

सदर योजनेंतर्गत खालीलप्रमाणे आकारमाना नुसार अनुदान दिले जाते. शेततळे योजनेसाठी कमीत कमी अनुदान 18621 असून जास्तीत जास्त 75000 आहे. शेततळ्याचे खोदकाम झाल्यानंतर प्लास्टीक अस्तरीकरण करण्यासाठी या http://mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर शेतकर्‍यांनी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा. प्लास्टीक अस्तरीकरण किंमतीच्या 50 टक्के अथवा 75 हजार रुपये याप्रमाणे अनुदान उपलब्ध आहे. आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी निश्‍चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहील. कार्यारंभ आदेश किंवा पूर्वसंमती पत्र मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे लाभार्थ्यांवर बंधनकारक राहील, अधिक माहितीकरिता कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version