मत्स्य विभागाचा निर्णय; जिल्ह्यातील मच्छिमारांकडून अद्याप अंमलबजावणी नाही
| उरण | वार्ताहर |
जिल्ह्यातील प्रत्येक मासेमारी नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, बहुसंख्य मच्छिमारांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मत्स्य विभागाकडून कोणती कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मत्स्य व्यवसाय विभाग व सागरी सुरक्षा यंत्रणेतर्फे मासेमारी नौकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येते. अशा मासेमारी नौकांवर कार्यरत असलेले नौकामालक, तांडेल व खलाशी यांचे मूळ ओळखपत्र, नौकेची नोंदणी यांचे प्रमाणपत्र, मूळ मासेमारी परवाना, विम्याच्या प्रती तसेच नौकेवरील तांडेल व खलाशी यांची मानकानुसार (व्हीआरसी) जीवनरक्षक साधने, अग्निशमन साधने नसल्याचे आढळते. अतिरिक्त तांडेल किंवा खलाशी आढळल्यास सागरी सुरक्षा यंत्रणेतर्फे अतिरिक्त तांडेल, खलाशांवर कठोर कार्यवाही करण्यात येते. मच्छिमारांनी नौकेवर जीवनरक्षक साधनुसमवेत यांत्रिक नौकावर व्हेसल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीटीएस), स्वयंचलित ओळखप्रणाली (एआयएस), जिल्हा अलर्ट ट्रान्समीटर (डीएटी) आदी यंत्रप्रणाली बसवणे आवश्यक आहे तसेच सागरी सुरक्षेचा हेतू लक्षात घेता प्रत्येक मासेमारी नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. मात्र, मासेमारी नौका मालकांकडून त्याबाबत गांभीर्याने न घेता कॅमेरे बसवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.