माता, बालकांच्या सुदृढतेसाठी अभियान

खालापूर पंचयत समितीला महिला बालकल्याण विभागाची भेट माता, बालकांच्या आरोग्यासाठी अभियान
कौतुकास्पद कामगिरीबद्दल अंगणवाडी सेविकांचा सन्मान

| खोपोली | प्रतिनिधी |

माता आणि बालके सुदृढ राहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी पोषण महिना अभियान राबविले जात आहे. 1 सप्टेंबरपासून सुरू झालेले हे अभियान 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात विविध उपक्रम तसेच कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानिमित्त बालविकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी खालापूर तालुक्याला भेट दिली. यावेळी पंचायत समितीकडून या अभियानात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणार्‍या अंगणवाडी सेविकांचा प्रोत्साहित करण्यासाठी चांगल्या कामगिरीबद्दल प्रशिस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. तर, पुढील काळात या सप्ताहात कशा प्रकारे उपक्रम राबविण्यात यावेत, यासंदर्भात अंगणवाडी सेविकांना मंडलिक यांनी माहिती दिली.

यावेळी खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर एकात्मित बालविकास चेतन गायकवाड यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी नितीन मंडलिक यांनी पोषण महिना अभियान सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून, माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. मातेला अतिसारावर उपाययोजना करणे, पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन कालावधीदरम्यान हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व पटवून देण्यासंदर्भात माहिती दिली.

यामध्ये पहिले 1000 दिवस बाळाचे पालन पोषण व संगोपन करणे. हात धुणे व वैयक्तिक स्वच्छता याबाबत जनजागृती करणे. पौष्टिक आहार, सर्वसमावेशक संतुलित आहार देण्यात येणार आहे. तसेच महिन्याच्या कालावधीत एकदा गावामध्ये प्रभातफेरी काढून आरोग्य व पोषण पोषण अभियानांतर्गत यापूर्वी जिल्हा परिषदेची उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे सांगितले. पोषण अभियानातंर्गत यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेने उत्तम कामगिरी बजावली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये राबविण्यात आलेल्या पोषण महिना अभियानात उत्तम कामगिरी बजावत लोकसहभागातून रायगड जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच याबाबत जिल्ह्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन रायगड जिल्हा परिषदेला गौरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खालापूर तालुक्यातील 204 अंगणवाडीमध्ये लहान बालके शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

यावेळी नितीन मंडलिक यांनी, राष्ट्रीय पोषण महिना अभियान उद्दिष्ट व महत्त्व समजावून सांगणे. 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत सहा वर्षांपर्यंतच्या बालकांची वजन व उंची मापन धडक, मोहिमेचे अंगणवाडी स्तरावर आयोजन करणे, पोषण माह साजरा करताना गरोदर महिला, स्तनदा माता व सहा वर्षांपर्यंतच्या बालकांकरिता अंगणवाडी स्तरावर विविध विषयक संदेशाचा प्रचार व प्रसार करण्यात येईल, असे अनेक कार्यक्रम या सप्ताहात घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version