लाडक्या बहिणींना हवेय चिऊताई; शहरी भागासह ग्रामीण भागात होतोय प्रचाराचा धडाका
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचाराचा वेग आता वाढत आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागात प्रचाराचा धडाका वेगाने सुरु झाला आहे. लाडक्या बहिणींनादेखील चिऊताईच आमदार हवेय म्हणून त्यादेखील प्रचारासाठी पुढाकार घेत आहेत. तरुणींचादेखील यामध्ये सक्रीय सहभाग आहे. घरोघरी जाऊन चिऊताईंना मतदान करण्याचे आवाहन महिला करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अलिबाग, मुरूड, रोहा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रचाराला सुरुवात केली. पेझारी येथे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात त्या स्वतः गावोगावी जाऊन मतदारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. चिऊताई यांच्या प्रचाराला कार्यकर्त्यांसह महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरुणवर्गदेखील स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र आहे. मतदान 20 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे आठच दिवस शिल्लक आहेत.
चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना विधानसभेत महिला आमदार म्हणून पाठविण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच लाडक्या बहिणीदेखील घरातून बाहेर पडू लागल्या आहेत. गावागावातील घराघरात जाऊन चित्रलेखा पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना करीत आहेत. गावांतील महिलांना भेटून चिऊताईंच्या कार्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. चिऊताई यांच्या प्रचाराला महिलांचा पुढाकार दिवसेंदिवस वाढत आहेत. रात्रीचा दिवस करून महिला प्रचारात सहभागी होत आहेत. अठरा वर्षांपासून 50हून अधिक वर्षांपर्यंतच्या महिला स्वयंस्फूर्तीने प्रचारात सामील होत आहेत.
युवराजही मैदानात
चिऊताई यांच्या प्रचारासाठी त्यांचे सुपुत्र युवराज पाटील आणि प्रशांत नाईक यांची कन्या अक्षया नाईक प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यांच्याबरोबर इतर तरुण, तरुणीदेखील उत्साहाने प्रचारात सहभागी झाल्या आहेत. चिऊताईंचे कार्य तरुणांमध्ये पोहोचविण्याचे काम ही सर्व तरुणाई करीत आहे. मतदारांकडून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान, चिऊताईंना महिलावर्गासह तरुणवर्गाकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Related