मोहन धुमाळसह अनिल पाटील, अंजली पाटील यांचे जल्लोषात स्वागत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कावीर जिल्हा परिषद मतदार संघासह कावीर पंचायत समिती आणि रामराज पंचायत समिती मतदार संघात प्रचाराचा धमाका शेकाप मार्फत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे.गाव बैठकांसह थेट मतदारांना भेटून खटारा चिन्हासमोरील बटण दाबून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. या मतदार संघात प्रचाराची आघाडी दिसून येत असून मोहन धुमाळसह अनिल पाटील आणि अंजली पाटील यांना मतदारांसह कार्यकर्त्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गावे, वाड्या वस्त्यांमध्ये आगमन होताच त्यांचे औक्षण करीत ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या कावीर मतदार संघात शेकाप महाविकास आघाडीकडून मोहन धुमाळ उभे राहिले आहेत. कावीर पंचायत समिती मतदार संघातून अनिल पाटील, आणि रामराज मतदार संघातून अंजली पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हा परिसर शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघात शेकाप मार्फत वेगवेगळी विकास कामे करण्यात आली आहे. तळागाळातील घटकाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजही या मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.कावीर जिल्हा परिषद मतदार संघातील शेकापचे उमेदवार मोहन धुमाळ हे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्राससह सामाजिक, क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. सर्वसामान्यांच्या हित साधणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
कावीर पंचायत समिती मतदार संघातील शेकापचे उमेदवार अनिल पाटील हे राजकीय, सामाजिक क्रीडा, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी पंचायत समितीचे सदस्यपासून सभापती म्हणून धुरा सांभाळली आहे. या परिसराच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्व स्तरातील घटकाला सामावून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये त्यांचा एक वेगळा हातखंडा आहे. तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांना ओळखले जाते. शेतकरी कामगार पक्षाचे आठ वेळा तालुका चिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तालुक्यात पक्षवाढीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. विरोधकांनाही आपलेसे करण्याची त्यांची एक वेगळी ख्याती आहे.
रामराज पंचायत समिती मतदार संघातून शेकापच्या अंजली पाटील उभ्या राहिल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून त्या राजकारणासह समाजकार्यात सक्रीय आहेत. सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अंजली पाटील यांनी देखील सामाजिक, राजकीय क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारे हे उमेदवार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदार संघामध्ये प्रचार सुरु आहे. गावोगावी प्रचाराचा धमाका वेगात सुरु आहे. या प्रचाराच्या दरम्यान शेकाप उमेदवारांना मतदारांसह कार्यकर्त्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळेल, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे.






