उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र
| मुंबई | वृत्तसंस्था |
काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीर येथे भाविकांच्या बसवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध करत उद्धवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारताने 9 जूनला टी-20 विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवले होते. मात्र, स्पर्धेतील पुढील टप्प्यात जर दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने आले, तर हा सामना रद्द करावा, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती उद्धवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी दिली. दुबे यांनी पतंप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि बीसीसीआयलाही हे पत्र पाठवले आहे. भारतात सुरू असलेल्या हिंसाचाराकडे लक्ष देता पाकसोबतचे सामने रद्द करण्यात यावे, असे या पत्रात म्हटले आहे. दोन दिवसांआधी जम्मू – काश्मीरच्या कठुआ आणि डोडा जिल्ह्यात आतंकवाद्यांशी रात्रभर झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या एका जवानाला वीरगती प्राप्त झाली होती आणि सहा सुरक्षाकर्मी जखमी झाले होते. तसेच, गेल्या रविवारी रियासी जिल्ह्यात उत्तर प्रदेशमधील तीर्थयात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या बसवर आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 9 जणांचा मृत्यू आणि 33 व्यक्ती जखमी झाले होते.