| अलिबाग | प्रतिनिधी |
इंडियन नर्सिंग कौन्सिल आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची परवानगी न घेता, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सारा नर्सिंग कॉलेज चालविले जात आहे. बेकायदेशीररित्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. परवानगी नसताना चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयाची परवानगी रद्द करण्यात यावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांना अन्य महाविद्यालयात पाठविण्यात यावे, अशी मागणी शेकापचे आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे. अधिवेशनात याबाबत आवाज उठवून हा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशी सभागृहाकडे मागणी केली.
सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्याने 3 जून 2025 मध्ये महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना घडून एक महिना उलटून गेला आहे. याबाबत पोलीस यंत्रणेने कोणती चौकशी केली, या चौकशीत काय आढळून आले, संबंधितांविरोधात कारवाई केली का, असा सवाल डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त करीत तपासाबाबत नाराजी व्यक्त केली.
पनवेल येथे सारा नर्सिंग महाविद्यालय अनेक महिन्यांपासून चालू आहे. या महाविद्यालयाला कोणत्या कागदपत्रांच्या आधारे परवानगी देण्यात आली, असा प्रश्न बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित करीत महाविद्यालयातील अद्ययावत सोयी-सुविधा, ग्रंथालय, वसतिगृह व अद्ययावत इमारतीबाबत शंका व्यक्त केली. त्यामुळे या महाविद्यालयाची परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी अधिवेशनात केली.
या प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी यांनी सांगितले की, जातीवाचक बोलण्याप्रकरणी विद्यार्थ्याला वाईट वाटल्याने त्याने आत्महत्या केली. याबाबत विद्यार्थ्याच्या पालकांनी सारा नर्सिंग महाविद्यालयाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची नोंद 10 जूनला करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध तपास पथकांमार्फत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे, न्याय देण्यासाठी कटिबद्ध असून, त्यापद्धतीने कारवाई केली जात आहे. सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन योगेश कदम यांनी दिले. मात्र, महाविद्यालयाची परवानगी गृहविभागाच्या अखत्यारितला विषय नाही. मात्र, संबंधित विभागाकडून माहिती घेतली जाईल. महाविद्यालयाची सर्व कागदपत्रे तपासली जातील. चुकीची कागदपत्रे आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही आश्वासन कदम यांनी दिले.