| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील परेश नाका-दरबार रोड व एकदरा पुलापर्यंतच्या रस्त्याला निधी मिळालेला आहे. असे असतानाही ठेकेदाराकडून नविन रस्ता बनवला जात नसेल तर त्याचा ठेका रद्द करुन नव्याने निविदा काढावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नगरसेवक रूपेश पाटील यांनी मुरूडच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता सांगळे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
या निवेदनात, मुरुड शहरातील परेश नाका-दरबार रोड ते एकदरा पुलापर्यंतच्या मुख्य रस्त्याला कित्येक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याचे नुतनीकरण करण्यासाठी निविदा 2023 मध्ये काढली होती व ती संबंधित ठेकेदाराला मंजुरही झालेली आहे; परंतु, त्यांचे काम संबंधीताकडून अद्याप सुरू केलेले नाही. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग देखील स्वतः लक्ष घालत नाही. ठेकेदार मुदत वाढ मागत असून आपण देत असल्याने ठेकेदार बिंधास्त आहे. आता मुदत वाढ न देता हा ठेका रद्द करून नव्याने निविदा काढावी. तसेच, आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत पहिले रस्त्यावर पडलेले मोठं मोठे खड्डे डांबर व खड्डी टाकुन बुजावेत आणि नव्याने चांगल्या दर्जाचे सुंदर व मजबूत रस्ता बनवा आणि नागरिकांना दिलासा द्या, असे म्हटले आहे.






