उद्धवसेना नगरसेवक रूपेश पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरातील परेश नाका दरबार रोड ते एकदरा पुलापर्यंतच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, निधी मंजूर होऊनही ठेकेदाराकडून काम सुरू न झाल्याने सदर रस्त्याचा ठेका रद्द करून नव्याने निविदा काढावी, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक रूपेश पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुरुड येथील कनिष्ठ अभियंता सांगळे यांच्याकडे निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुरुड शहरातील परेश नाका दरबार रोड ते एकदरा पुलापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दरबार रोड परिसरातील स्थानिक नागरिकांना, पंचक्रोशीतील ग्रामस्थांना, तहसील कार्यालय, पंचायत समिती व न्यायालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहनचालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी सन 2023 मध्ये निविदा काढून संबंधित ठेकेदारास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, आजतागायत ठेकेदाराकडून कोणतीही कामाची हालचाल झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही याकडे दुर्लक्ष होत असून, ठेकेदाराकडून वारंवार मुदतवाढ मागितली जात आहे व ती दिली जात असल्याने ठेकेदार निर्धास्त झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी उद्धवसेना नगरसेवक रूपेश पाटील, समाजसेवक विजय सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राकेश चोगले तसेच अमित, आयुष, साई, उसामा, अलीम, इब्राहिम, बाबू कोकाटे, इस्माईल, हनीफ, रिजवान, उमेर आदी स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
