। मुंबई । वृत्तसंस्था ।
एसटी महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीत 10 टक्के भाडेवाढ केली जाते. मात्र, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने जाहीर केलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. दिवाळीत केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द केल्यामुळे एसटी महामंडळाला मिळणारी अतिरिक्त रक्कम यंदा मिळणार नाही. मात्र, या निर्णयाचा प्रवाशांना फायदा होणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार होता. परंतु, आता एसटीच्या तिकिटाचे दर जैसे थे अवस्थेत राहतील.
मुंबई-पुणे मार्गावर धावणार्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेप्रमाणेच आदरादिथ्य आणि व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा-सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. एस.टी. महामंडळाच्या प्रत्येक बसस्थानकांवर त्या परिसरातील महिला बचतगटांना आपले स्थानिक पदार्थ विकण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन 10 बाय 10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून दिला जाणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे, तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे, अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.