गुकेशची विदितवर मात
। टोरंटो । वृत्तसंस्था ।
विश्रांतीच्या दिवसानंतर दमदार पुनरागमन करताना डी. गुकेशने आठव्या फेरीत भारताच्याच विदित गुजराथीवर मात करत कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत पुन्हा संयुक्तरीत्या आघाडी मिळवली. इयान नेपोम्नियाशीला अझरबैजानच्या निजात अबासोवला नमवण्यात अपयश आले. त्यामुळे आता गुकेश आणि नेपोम्नियाशी यांचे समान पाच गुण आहेत. खुल्या विभागातील अन्य भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने अलिरेझा फिरुझाविरुद्ध बरोबरी नोंदवली.
17 वर्षीय गुकेशला सातव्या फेरीत फिरुझाकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आठव्या फेरीत त्याने अधिक लक्षपूर्वक खेळ करताना नाशिककर विदितला 38 चालींत पराभूत केले. विशेष म्हणजे, गुकेशने हा विजय काळय मोहर्यांनी खेळताना मिळवला. यापूर्वी गुकेश आणि विदित पहिल्या फेरीतही आमनेसामने आले होते. ती लढत बरोबरीत सुटली होती. आठव्या फेरीतील लढतीत मात्र विदितला आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. गेल्या दोन कॅन्डिडेट्समधील विजेत्या नेपोम्नियाशीला यंदाच्या स्पर्धेत सर्वात खालचे मानांकन असलेल्या अबासोवने बरोबरीत रोखले. अबासोवने पहिल्या फेरीतही नेपोम्नियाशीविरुद्ध बरोबरीची नोंद केली होती. दुसरीकडे, अमेरिकेच्या दोन अनुभवी ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंमध्ये झालेल्या आठव्या फेरीच्या लढतीत हिकारू नाकामुराने अग्रमानांकित फॅबियानो कारुआनावर विजय मिळवला. प्रज्ञानंदला पांढर्या मोहर्यांचा फायदा करून घेता आला नाही आणि त्याला फिरुझाविरुद्ध अध्र्या गुणावर समाधान मानावे लागले.
आठ फेर्यांअंती, गुकेश आणि नेपोम्नियाशी प्रत्येकी पाच गुणांसह संयुक्तरीत्या अग्रस्थानी आहेत. प्रज्ञानंद आणि नाकामुरा त्यांच्यापेक्षा केवळ अध्र्या गुणाने मागे आहेत. कारुआना चार गुणांसह पाचव्या स्थानी आहे. त्यांच्या खालोखाल विदित (3.5 गुण) सहाव्या, फिरुझा (3) सातव्या आणि अबासोव (2.5) आठव्या स्थानावर आहे. महिला विभागात, दोन भारतीय ग्रँडमास्टरमध्ये झालेल्या लढतीत अनुभवी कोनेरू हम्पीने पांढर्या मोहर्यांनी खेळताना आर. वैशालीवर 63 चालींत मात केली. हम्पीचा यंदाच्या स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. त्यामुळे चार गुणांसह ती थेट संयुक्त पाचव्या स्थानी आली आहे. वैशाली 2.5 गुणांसह तळाला आहे. सात फेर्यांमध्ये अग्रस्थान टिकवून ठेवलेल्या टॅन झोंगीला आठव्या फेरीत चीनच्याच ले टिंगजीकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे आता झोंगी, टिंगजी आणि अलेक्झांड्रा गोर्याचकिना प्रत्येकी पाच गुणांसह संयुक्तरीत्या अग्रस्थानावर आहेत. सहा फेर्या शिल्लक असताना महिला विभागातील चुरस आता वाढली आहे.
खुल्या विभागात, गुकेशने विदितविरुद्ध अप्रतिम खेळ केला. त्याने सुरुवातीलाच विदितला थोडे गोंधळात टाकले. त्यामुळे पांढर्या मोहर्यांनी खेळणार्या विदितने पाचवी चाल रचण्यापूर्वी जवळपास 20 मिनिटे घेतली. त्यानंतर विदितने पटाच्या दोन्ही बाजूंनी गुकेशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डावाच्या मध्यात गुकेशने आपल्या वजीर आणि हत्तीचा खुबीने वापर करताना लढतीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. यानंतर विदितने पुन्हा चांगल्या स्थितीत येण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडे चाली रचण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नव्हता. गुकेशने पूर्ण वर्चस्व मिळवताना आठव्या घरात प्रवेश केला आणि विदितने 38 चालींअंती हार मान्य केली.