| पनवेल | प्रतिनिधी |
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रतिज्ञापत्र तयार करून घेताना पनवेल तहसील कार्यालयात अडथळे येत आहेत. काही दिवसांपासून सव्हर डाऊन असल्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र तयार होऊ शकलेले नाही. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची, तसेच विविध कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत आहे.
पनवेल तहसील कार्यालयात सर्व्हर डाऊन असण्याची समस्या अनेकदा जाणवत असते. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उमेदवारांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. आतापर्यंत जवळपास 500 निवडणूक अर्जांची विक्री झाली आहे. परंतु, अद्यापही एकाही उमेदवारानेही अर्ज भरलेला नाही. मात्र, या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. अर्ज भरताना विविध कारणांसाठी उमेदवारांना प्रतिज्ञापत्र देणे गरजेचे असते. महसूल विभागाच्या माध्यमातून पनवेल पालिका क्षेत्रातील उमेदवारांसाठी पनवेल तहसील कार्यालयातून प्रतिज्ञापत्र यावे लागते. इच्छुक उमेदवारांसह इतर कामे घेऊन येणान्या नागरिकांची सेतू कार्यालयात गर्दी होत आहे. परंतु, ऑनलाइन प्रतिज्ञापत्र तयार करण्यात येणाऱ्या वेबसाइटचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी यांना ताटकळल थांबावे लागते आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्र मिळू न शकल्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.






