महापालिका 9 लाख, झेडपी 7.50 लाख तर पं.स. 5.25 लाख
| रायगड | प्रतिनिधी |
राज्य निवडणूक आयोगाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारास नऊ लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे. दुसरीकडे रायगड जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांना प्रत्येकी साडेसात लाखांपर्यंत मर्यादा असणार आहे. पूर्वी ही मर्यादा साडेतीन लाखांचीच होती. तर पंचायत समितीच्या उमेदवारांना सव्वापाच लाखांची मर्यादा आहे.
आगामी 10 ते 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा आठ-नऊ वर्षांपूर्वी निश्चित झाली होती. निवडणुकीत मोठा खर्च व्हायचा, पण आयोगाची मर्यादा खूपच कमी असल्याने अनेकजण वेगवेगळ्या मार्गाने खर्च लपविण्याचा प्रयत्न करतात, अशी चर्चा नेहमीच व्हायची. त्यामुळे आता वाढलेली महागाई, प्रचार साहित्याचे वाढलेले भाव, इंधन दर अशा बाबींचा अंदाज घेऊन राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढवली आहे. त्यात चहा आठ ते दहा रुपये, नाष्टा 15 ते 25 रुपये, जेवण 50 ते 70 रुपये असे दर आहेत.
रायगड जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी 2026 मध्ये संपणार आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार आता या ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने खर्चाची नवी मर्यादा निश्चित केली आहे. सात ते नऊ सदस्याच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 75 हजार तर सदस्यांसाठी प्रत्येकी 40 हजार, 11 ते 13 सदस्य असलेल्या ठिकाणी सरपंचपदासाठी दीड लाख तर सदस्यांसाठी 55 हजार रुपये खर्चाची मर्यादा असेल. तर 15 ते 17 सदस्यांच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या उमेदवारास दोन लाख 65 हजार रुपये आणि सदस्य पदाच्या उमेदवारास प्रत्येकी 75 हजार रुपयांचा खर्च करता येणार आहे.
