पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघावर कर्णधार बाबर आझम नाराज

। पाकिस्तान । वृत्तसंस्था ।
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सोमवारी संघ जाहीर केला. यात काही आश्‍चर्यजनक नावे दिसल्याने पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना धक्काच बसला. स्वतः कर्णधार बाबर आझम या निवडीवर नाराज आहे. ही संघ निवड करताना कर्णधारालाच विश्‍वासात न घेतल्याचा दावा केला जात आहे. आझम खान व सोहैब मक्सूद यांच्या निवडीवरून आझम नाराज आहे.

पीसीबीच्या चेअरमनपदी लवकरच विराजमान होणार्‍या रमीझ राजा यांच्याशी चर्चा करून निवड समितीने खान व मस्कूद यांची निवड केल्याचे म्हटले जात आहे. पण, बाबर आझमला संघात फहीम अश्रफ व फाखर जमान हवे होते. त्यासाठी बाबरने रमीज राजा यांच्यासोबत चर्चा केली होती, परंतु राजा यांनी त्याचे ऐकले नाही. तू तुझ्या खेळावर लक्ष दे, संघ निवडीवर नाही, असा मॅसेज त्याला पाठवला गेला.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट मंडळानं हे सर्व वृत्त फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या संघ निवडीवरून वाद सुरू आहे आणि बाबर आझम नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्या सर्व अफवा आहेत, असे पीसीबीचे सीईओ वासीम खान यांनी सांगितले. बाबार आझमचा या संघाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचेही त्यानं नमुद केले.

Exit mobile version