संघासमवेत मानसशास्त्रज्ञही येणार
| इस्लामाबाद | वृत्तसंस्था |
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीत जगभरातील संघ व्यस्त आहेत. क्रिकेटच्या महाकुंभात जगभरातून 10 संघ सहभागी होणार आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ भारतात येणार की नाही, हा चेंडू तेथील सरकारच्या हातात आहे. यावर काही दिवसांत निर्णय घेतला जाईल, मात्र पाक संघ सध्या तणावामध्ये आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हाय-प्रोफाइल स्पर्धेच्या दबावाचा सामना करण्यासाठी संघासह मानसशास्त्रज्ञ भारतात पाठवण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांच्या कर्णधार बाबर आझम यांच्या भेटीनंतरच घेतला जाणार आहे. बाबर आझम सध्या लंका प्रीमियर लीग मध्ये कोलंबो स्ट्रायकर्सकडून खेळत आहे.
खेळाडूंसोबत मानसशास्त्रज्ञ असण्याने त्यांना मदत होईल, विशेषत: जेव्हा ते भारत दौऱ्यावर चांगली कामगिरी करत नसतील किंवा त्यांना बाहेरील दबाव जाणवत असेल,अशी अपेक्षा पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी व्यक्त केली.तरपीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानसाठी मानसशास्त्रज्ञांची उपस्थिती अनिवार्य आहे, कारण ते 2016 नंतर प्रथमच भारताला भेट देत आहेत. जका अश्रफ पीसीबीचे अध्यक्ष असताना त्यांनी खेळाडूंसोबत काम करण्यासाठी प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मकबूल बाबरी यांना बोलावले होते आणि ते 2012-13 मध्ये त्यांच्यासोबत भारतात आले होते. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 2011 च्या विश्वचषकासाठी भारताच्या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंनी क्रीडा मानसशास्त्रज्ञांसोबत काही सत्रे केली होती. पाकिस्तान वर्ल्ड कप 2023 चे सामने हैदराबाद, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आणि अहमदाबाद येथे खेळणार आहे.