कप्तान रोहित शर्मा सुपरहिट

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बर्‍याच दिवसांपासून रोहित शर्माला टीम इंडियाची कमान देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. टी-20 विश्‍वचषक 2021 स्पर्धेनंतर विराट कोहलीऐवजी रोहितला टी-20 आणि एकदिवसीय संघाची कमान दिली जाऊ शकते. आयपीएलमध्ये रोहितने स्वतःला कर्णधार म्हणून सिद्ध केलेले आहे, सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याने टीम इंडियाला 80 टक्के सामन्यांमध्ये विजयाकडे नेले आहे. या कारणास्तव तो बीसीसीआयच्या विश्‍वासू खेळाडूंपैकी एक आहे. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयसीसी ट्रॉफी व्यतिरिक्त अजून आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही. त्याचबरोबर रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. रोहितने टीम इंडियासाठी आतापर्यंत 29 सामन्यांचे नेतृत्व केले आहे. यात त्याने 23 सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला, तर केवळ 6 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. रोहित आपल्या खेळाडूंना दबावाखालीही चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसला आहे. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 15 टी-20 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. टी-20 मध्ये भारतासाठी तो तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने 41 आणि विराट कोहलीने 27 टी-20 सामने जिंकले आहेत. रोहितने आतापर्यंत 19 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्याला 4 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने 10 पैकी 8 सामने जिंकले आणि फक्त दोन सामने गमावले आहेत.2018 मध्ये टी-20 आशिया चषकात, भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला आणि त्यांनी विजेतेपदही मिळवले. अंतिम फेरीत संघाने बांगलादेशचा 3 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाला 2023 मध्ये मायदेशात एकदिवसीय विश्‍वचषक खेळायचा आहे. याआधी रोहितला त्याच्यानुसार खेळाडूंना तयार करण्याची संधी मिळेल. त्यामुळे बोर्डालाही रोहितला तयारीसाठी पुरेसा वेळ द्यायचा आहे. या स्पर्धेत रोहितच भारताचे नेतृत्व करेल, असा सर्वांना ठाम विश्‍वास आहे.

Exit mobile version