मद्यपान करणे पडले महागात
| माथेरान | प्रतिनिधी |
मद्यपान करून वाहन चालवणं एका पर्यटकाला चांगलंच महागात पडलं आहे. माथेरान घाटात घडलेल्या अपघातात त्याच्या नव्या कोऱ्या कारचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा सहप्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित पर्यटकाने मद्यपान केल्यानंतर माथेरान घाटातील येस टन म्हणून प्रचलित असणाऱ्या जुमापट्टी येथील वळणदार रस्त्यावर नियंत्रण गमावले. त्यामुळे वाहन थेट रस्त्याच्या खोलगट बाजूला उलटले. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अपघातात वाहनाचे पुढचे, मागचे आणि बाजूचे भाग पूर्णपणे दबले आहेत. या घटनेत वाहन चालकाचा मित्र किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई सुरू केली.







