नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला रात्री अपघात झाला असून या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. रात्रीची वेळ असल्याने त्या जखमींना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आल्याने जखमींच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती नेरळ पोलिसांकडे नाही.
सीजी 11-एझेड 1428 ही मारुती स्विफ्ट डिझायर कार माथेरान येथे जाण्यास आली होती.खासगी कारने माथेरान मध्ये पर्यटनासाठी आलेल्या त्या कारला नेरळ-माथेरान घाटात वॉटर पाईप स्टेशन च्या अलीकडे असलेल्या चढाव आणि तीव्र वळणावर अपघात झाला.या खासगी कार मधून चार प्रवासी प्रवास करीत होते अशी माहिती मिळत असून कार चालक,त्यांची पत्नी आणि दोन मुले असे चार जण गाडीचा उजव्या बाजूच्या टायर फुटल्याने झालेल्या अपघातात जखमी झाले.रात्रीची वेळ असल्याने स्थानिक टॅक्सी चालकांनी त्यांना प्रवासी कार मधून खाली नेरळ येथे आणले आणि नेरळ येथून रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर त्या चारही जखमी रुग्णांना त्या जखमींची विनंती नंतर मुंबईतील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पाठविण्यात आले.काही महिन्यांपूर्वी दुचाकीला अपघात झाला होता आणि त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता.