मांडव्याजवळ कार-दुचाकीचा अपघात

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागकडून मांडव्याकडे जाणार्‍या कार व दुचाकीचा अपघात शुक्रवारी सकाळी झाला. या अपघातात दोन्ही वाहनांमधील तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामध्ये कारचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कार चालक त्याची एम.एच. 46 ए.यू. 2841 या क्रमांकाची कार घेऊन अलिबागकडून मांडव्याकडे जात होता. त्याच वेळी एम.एच. 06 ए.पी. 2713 या क्रमांकाची दुचाकीदेखील त्याच मार्गाने जात होती. चोंढीजवळ आल्यावर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. दरम्यान, समोरुन येणार्‍या दुचाकीला वाचविताना कार रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडाला धडकली. त्यामुळे कारचे प्रचंड नुकसान झाले.

कारमध्ये असलेल्या एअर बॅगमुळे दोघांचा जीव वाचला. त्यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, दुचाकीचेदेखील नुकसान झाले असून, दुचाकी चालकही जखमी झाला आहे. या जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Exit mobile version