। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाट परिसरात गुरुवारी (दि.12) पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. पोलादपूर–महाबळेश्वर–वाई–सुरूर राज्य मार्गावरील बावली टोकाजवळ मारुती वॅग्नर कार सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील लाखवड गावातील काही ग्रामस्थ मुंबईहून आपल्या गावी परतत होते. पहाटेच्या वेळी आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंड दरम्यान वाहनाचा ताबा सुटल्याने वॅग्नर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खोल दरीत कोसळली. वाहनाचा वेग आणि तीव्र वळण यामुळे कार थेट दरीत कोसळली. अपघातानंतर कार सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत जाऊन अडकली. या अपघातात अजय सुनील संकपाळ, तुकाराम संकपाळ, सुनील संकपाळ, पार्थ संकपाळ आणि संगीता संकपाळ हे प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सर्व जखमींना तातडीने बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य तसेच महाबळेश्वर ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलादपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. अत्यंत धोकादायक परिस्थितीत उतरून जखमींना बाहेर काढणाऱ्या स्वयंसेवकांच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.







