झाडाला अडकल्याने चालकाचा थरारक बचाव
। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीजवळील गारमाळ रस्त्यावर सोमवारी (दि.3) दुपारी स्कोडा कार सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. मात्र, दरीतील झाडाला कार अडकल्याने मोठी दुर्घटना टळली असून, चालकाचा थरारक बचाव करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कोडा कारमधील चालक गारमाळ परिसरात फिरण्यासाठी आला होता. गारमाळच्या डोंगररस्त्यावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला घसरून थेट सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. दरीत कोसळताना कार एका मोठ्या झाडाला अडकल्याने ती आणखी खोल दरीत जाण्यापासून थांबली आणि मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली होती. गारमाळ परिसरातील डोंगररस्ते पावसामुळे निसरडे झाले असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
