रोगराईमुक्त पावसाळयासाठी दक्षता घ्यावी -फणसे

जिल्हा परिषद प्रशासनाचे आवाहन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पावसाळ्यात ठिकठिकाणी सखल भागामध्ये तसेच खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते हे साचलेले पाणी विहीरी, विंधण विहीरी तसेच नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाण्यामध्ये मिसळून सदर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. दूषित पाण्यामुळे साथरोग तसेच कीटकजन्य आजार फैलावण्याचा धोका असून, रोगप्रसार टाळण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दयावे व रोगराईमुक्त पावसाळयासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छत डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे. दूषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, विषमज्वर अशा जलजन्य साथरोगांची सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच सखल भागात साचलेले पाणी व सांडपाण्यातून कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळयांचा कालावधीत दूषित पाण्याच्या सेवनाने साथजन्य परिस्थिती उद्भवणार नाही या दृष्टीने गावपातळीवर पावसाळयांत पाणी गुणवत्तेच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पावसाळयात दूषित पाण्याच्या सेवनाने साथजन्य परिस्थिती उद्भवण्याची भिती असते. त्यामुळे जलजन्य आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी काही पूर्व प्रतिबंधक उपाय लक्षात घेणे गरजेचे आहे. पावसाळयात उघडयावरचे पदार्थ खाऊ नये तसेच घराची साफसफाई करताना ओला कचरा व सुका कचरा यांचे वेगवेगळे व्यवस्थापन करावे, घराभोवती पालापाचोळा, कचरा, पाण्याची डबकी साठवून देऊ नये, पाणवठे शुद्ध ठेवणे गरजेचे आहे, पिण्याचे पाणी शुद्ध निर्जतुंक करून प्यावे, पाणी गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी पाणी शुद्धीकरणासाठी घरगुती वापरासाठी मेडीक्लोरीनचे द्रावण किंवा टीसीएल पावडरचा उपयोग करावा, पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, घरातील पिण्यांच्या पाण्याची टाकी किंवा माठ यांची दररोज स्वच्छता करावी, हातपंपाचे शुदधीकरण करावे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी व सांडपाण्यासाठी गटारे प्रवाहीत करावीत, डासांची उत्पतीस्थाने नष्ट करण्यासाठी टाक्यांना झाकण लावणे, संवेदनशील भागात किटकनाशकांचा उपयोग करणे आदी प्रतिबंधक उपाय करावेत, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच शौचालयाचा वापर करावा अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. तसेच पावसाळयात साथीचे आजार उद्भवल्यास त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जि.प.प्रशासनाने केलेले आहे.

पावसाळयात काळजी घेतल्यास आपले कुटुंब आणि परिसरातील नागरिकांना आपण साथीच्या रोगांपासून मुक्त ठेवू शकतो, रोगप्रसार टाळण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दयावे व रोगराईमुक्त पावसाळयासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

– डॉ.किरण पाटील, सीईओ, रायगड जि.प.
Exit mobile version