राऊतांना आवरा

राजकारणात येण्यापूर्वी संजय राऊत हे गुन्हेगारी जगतावर लेख लिहित असत. भाई ठाकूर, दाऊद अशा टोळ्यांच्या आणि टोळीयुध्दाच्या बाबतीत त्यांनी लिहिलेले लेख लोक चवीने वाचत असत. दाऊदला आपण भेटलेलो आहोत आणि झापलेलंही आहे असं त्यांनी दोन वर्षांपूर्वी म्हटले होते. विशेष म्हणजे त्यांच्या खबर्‍यांचं जाळं अजूनही मजबूत आहे असं दिसतं. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनी आपल्याला मारायला सुपारी दिली आहे असा आरोप त्यांनी काल केला. शिवाय, सेनेचे चिन्ह शिंदे यांना देण्यासाठी दोन हजार कोटींचा व्यवहार झाला असा भन्नाट आरोपही त्यांनी केलाय. बाकीही त्यांचे रोजचे शब्दकारंजे उडत असतेच. राऊत यांच्या हाणा, मारा, ठोकाच्या आरोळ्या शिवसैनिकांमधील वीरश्री कायम राहण्यासाठी फार उपयुक्त आहेत असा शिवसेना नेत्यांचा समज दिसतो. अर्थात, स्वतः उद्धव ठाकरे मर्दाची अवलाद, गाडून टाकू अशीच भाषा येता-जाता वापरत असतात. त्यामुळे त्यांचाही राऊतांना पाठिंबाच असावा. पण या भाषेमुळे सेनेचा किंवा महाविकास आघाडीचा काहीही फायदा होणारा नाही. उलट आघाडीबाबत जी सहानुभूती लोकांमध्ये आहे ती कमीच होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण शिंदे गटाला देणे हा धडधडीत पक्षपाती निर्णय आहे असे महाराष्ट्रातील बहुसंख्यांचे मत आहे. शिवसेनेला या निर्णयाची चीड येणे स्वाभाविक आहे. पण त्यावर संयतपणे प्रतिक्रिया दिली असती तर सेनेची प्रतिमा अधिक उजळून निघाली असती. महाविकास आघाडीचे बाकीचे नेतेही याच्याशी आपला काहीच संबंध नाही अशा रीतीने याकडे पाहत आहेत. खरे तर भाजपबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी संघटित करणे ही महाविकास आघाडीची गरज आणि जबाबदारी आहे. अन्यथा, त्यांचे स्वतःचेच अस्तित्व धोक्यात येणार आहे. यापैकी काहींचे भाजपशी जुळवून घेण्याचे मनोरथ असतील तर गोष्ट वेगळी. पण आता शिंदे यांच्या फुटीनंतर भाजपमध्ये बाहेरच्यांची एकच भाऊगर्दी झालेली आहे. आणखी बाहेरच्यांना त्यात जागा आहे असे वाटत नाही. दुर्दैवाने आघाडीच्या नेत्यांची तोंडे अजूनही तीन दिशांना आहेत. प्रकाश आंबेडकरांसोबत युती असो की भविष्यातील जागावाटप, हरेक मुद्द्यावर आपले मतभेद व्यक्त करायला ते उतावीळ दिसतात. खरे तर, आता शिवसेनेचे चिन्ह काढून घेण्यामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ आघाडीतील सर्व पक्षांना होणार आहे. त्यामुळे त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हेदेखील त्यांनी संयुक्तपणे ठरवायला हवे होते. प्रत्यक्षात राऊत हे आपले गुरु शरद पवार यांनाही जुमानत नाहीत असं चित्र दिसतं आहे. शिंदे गटाने मात्र या सर्व प्रश्‍नांवर अत्यंत हुशारीने प्रतिक्रिया दिलेल्या दिसतात. सेना भवन वा शाखांवर आपण कबजा करणार नसल्याचा त्यांचा खुलासा हे त्याचेच उदाहरण आहे. बहुधा भाजपची शिकवणी त्यांनी लावलेली असावी. आघाडी, सेना आणि राऊत यांनी त्यांच्याकडून हे शिकण्यासारखे आहे. 

Exit mobile version