जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसचे जगज्जेतेपद कायम

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील 11व्या फेरीत कार्लसनने रशियाचा आव्हानवीर इयान नेपोम्निशीवर सहज वर्चस्व गाजवून नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन याने सलग पाचव्यांदा जेतेपदाचा किताब मिळवला आहे.
भारताचा ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंदला नमवून 2013मध्ये प्रथमच जेतेपद काबीज करणार्‍या कार्लसनने यंदाच्या लढतीत एकूण 7.5-3.5 गुणांच्या फरकाने तीन फेर्‍या बाकी असतानाच जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पांढर्‍या मोहर्‍यांसह खेळणार्‍या 31 वर्षीय नेपोम्निशीला आव्हान टिकवून ठेवण्यासाठी 11व्या फेरीत कार्लसनला किमान बरोबरीत रोखणे गरजेचे होते. परंतु 23व्या चालीत अतिआक्रमकपणा दाखवणे नेपोम्निशीला महागात पडले.
कार्लसनने मात्र चलाखीने घोड्याचा बळी दिला आणि तेथून पुढे नेपोम्निशीला सातत्याने चुका करण्यास भाग पाडले. अखेर 49व्या चालीनंतर नेपोम्निशीला हार मानावी लागली. यासंबंधी प्रसारमाध्यमांसह संवाद साधताना मॅग्नस कार्लसन यांने तीन फेर्‍या शिल्लक राखून जेतेपद मिळवेन, असे खरेच वाटले नव्हते. त्यामुळे आता फार समाधानी वाटत आहे. पहिल्या पाचही फेर्‍यांमध्ये नेपोम्निशीने कडवी झुंज देत मला बरोबरीत रोखले. मात्र सहाव्या डावापासून मी दडपणाखाली खेळ उंचावला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Exit mobile version