कार्लोसने जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपद

ऍलेक्झँडर झ्वेरेवला दिला पराभवाचा धक्का

| फ्रेंच | वृत्तसंस्था |

फ्रेंच ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद स्पेनच्या 21 वर्षीय कार्लोस अल्काराझने जिंकले आहे. त्याने पॅरिसमध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या ऍलेक्झँडर झ्वेरेव (साशा) याला पराभवाचा धक्का दिला. अत्यंत रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात 4 तास 19 मिनिटाच्या झुंझीनंतर अल्काराझने साशाला 6-3, 2-6, 5-7, 6-1, 6-2 अशा पाच सेटमध्ये पराभूत केले.

अल्काराझचे हे फ्रेंच ओपनचे पहिलेच विजेतेपद आहे. तसेच, एकूण कारकिर्दीतील तिसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. त्याने यापूर्वी 2022 मध्ये अमेरिकन ओपन आणि 2023 मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले आहे. या संपूर्ण सामन्यात दोन्ही खेळाडूंनी शेवटपर्यंत एकमेकांना कडवी झुंज दिली होती. मात्र, अल्काराझने अखेरीस बाजी मारली, त्याने मोक्याच्या क्षणी त्याचा खेळ उंचावला. त्याने मिळवलेल्या 16 ब्रेक पाँइट्सपैकी 9 जिंकले. मात्र, साशाला 23 ब्रेक पाँइंट्सपैकी केवळ 6 जिंकता आले. अल्काराझने पहिला सेट सहज जिंकला होता, पण नंतर साशाने दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करत अल्काराझला वरचढ होण्याची संधी दिली नाही. यानंतर तिसऱ्या सेटमध्ये दोघांमध्येही कडवी झुंज पाहायला मिळाली. पण तिसरा सेटही साशाने जिंकत आघाडी मिळवली. मात्र, अल्काराझनेही हार न मानता चौथा सेट जिंकला. त्यामुळे हा सामना पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला. पाचवा सेट अल्काराझने सहज जिंकत विजेतेपदालाही गवसणी घातली.

नदालचा मोठा विक्रम मोडण्याची संधी
अल्काराझ हा तीन वेगवेगळ्या पृष्ठभागावर ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात युवा टेनिसपटू आहे. त्याने स्पेनच्या राफेल नदालचा विक्रम मोडला आहे. नदालने वयाच्या 22 व्या वर्षी असा कारनामा केला होता. टेनिसमध्ये वर्षातून चार ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात. त्यातील ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन हार्ड कोर्टवर होते, तर विम्बल्डन ग्रास कोर्टवर होते. तसेच, फ्रेंच ओपन लाल मातीच्या कोर्टवर खेळवली जाते. अल्काराज 21 व्या वर्षापर्यंतच अमेरिकन ओपन, विम्बल्डन आणि आता फ्रेंच ओपनही जिंकल्याने त्याने तिन्ही प्रकारच्या कोर्टवर जिंकण्याचा पराक्रम केला आहे. अल्काराज तीन्ही प्रकारच्या कोर्टवर जिंकणारा एकूण सातवा पुरूष टेनिसपटू आहे. यापूर्वी राफेल नदाल, मॅट्स विलँडर, जिमी कॉनर्स, रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच आणि आंद्रे आगासी यांनी असा विक्रम केला आहे.
Exit mobile version