| लौसाने | वृत्तसंस्था |
दोन्ही हात नसल्यामुळे पायाने तिरंदाजी करून प्रभावशाली यश मिळवणाऱ्या शीतल देवीच्या पराक्रमाची दखल जागतिक तिरंदाजी संघटनेने घेतली आहे. तिला 2025 मधील सर्वोत्तम पॅरा तिरंदाज हा सन्मान दिला आहे.
जम्मू काश्मीरमधील 19 वर्षीय शीतल देवी जागतिक पॅरा तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला पॅरा तिरंदाज ठरली. दक्षिण कोरियातील ग्वाँझाऊ येथे झालेल्या महिलांच्या कंपाउंड प्रकारात तिने हे भव्य-दिव्य यश मिळवले होते. जन्मतः हात नसलेली शीतल देवीने तिरंदाजीत मिळवलेल्या प्रावीण्याबाबत तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पाय आणि खांद्याच्या सहाय्याने ती तिरंदाजी करते. जागतिक तिरंदाजीत शीतलने वैयक्तिक सुवर्णपदकानंतर संघिक रौप्य आणि मिश्र दुहेरीत ब्राँझ मिळवून तिन्ही पदके मिळवण्याचाही पराक्रम केलेला आहे. विश्व पॅरा तिरंदाजीत वैयक्तिक सुवर्णपदकासह शीतलने पॅरीस पॅरालिंपिक स्पर्धेत मिश्र दुहेरीत ब्राँझपदक जिंकले होते. या व्यतिरिक्त तिने 2022 मधील आशिया पॅरा गेम्स आणि 2023 मधील आशिया अजिंक्यपद स्पर्धेतही रौप्यपदकांची कमाई केलेली आहे. जगातील नामवंत पॅरा तिरंदाजांमध्ये आपल्याला नामांकन मिळणे आणि त्यानंतर सर्वोत्तम पॅरा तिरंदाज हा पुरस्कार मिळणे हा मोठा सन्मान असल्याची भावना शीतलने व्यक्त केली.







