गणेशोत्सव शांततेत पार पाडा: विनित चौधरी

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

आगामी गौरी गणपतीचे सण अत्यंत शांततेत आणि गुण्या गोविंदाने पार पाडावेत तसेच कोणत्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन करू नये. समुद्रात विसर्जन प्रसंगी योग्य ती काळजी घ्यावी. यासाठी नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच सण उत्सव साजरे करावेत, असे आवाहन अलिबाग उप विभागीय पोलीस अधिकारी विनित चौधरी यांनी केले. आगामी गणेशोत्सव व ईद या सणांच्या अनुषंगाने मुरुड पोलीस ठाणेतर्फे दर्या सारंग सभागृहात शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पुढे चौधरी म्हणाले की, जिल्हाधिकार्‍यांच्या समवेत झालेल्या बैठकीत गणेशोत्सवादरम्यान विद्युत बिल थकित असले तरी कनेक्शन न तोडण्याचे सूचित करण्यात आले आहे. तसेच, गणेश विसर्जन करताना मिरवणूकीच्या वेळी ध्वनी प्रदुषणाची मर्यादा पाळा. रस्त्यात व्यत्यय येईल अशा हातगाड्या व वाहनांचा चोख बंदोबस्त ठेवा. उनाड गुरांच्या मालकांवर थेट खटले दाखल करून अशी गुरे गोशाळेत पाठवा. तसेच, नगर परिषदेला पोलीस संरक्षण मिळेल याची ग्वाहीदेखील विनित चौधरी यांनी दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनित चौधरी यांचा स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपतीतर्फे पोलीस पदक 2024 जाहीर झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस उपनिरिक्षक अविनाश राठौड, अविनाश पाटील, सहा फौजदार दिपक राऊळ, संतोष कचरे, परेश कुंभार आदी मान्यवर तसेच नगरसेवक प्रमोद भायदे, नयन कार्णिक, श्रीकांत सुर्वे, डॉ. राज कल्याणी, जाहिद फकजी, शकील कडू, मनोहर मकू, वासंती उमरोटकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version