कोकणात थेट रेल्वेने कार नेता येणार

चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची सर्वात मोठी चिंता मिटली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे, वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा थकवा यातून सुटका होण्यासाठी कोकण रेल्वेने एक जबरदस्त उपाय शोधला आहे. ‌‘रो-रो’ सेवेच्या यशस्वी प्रयोगानंतर, आता प्रथमच प्रवाशांसाठी ‌‘कार ऑन ट्रेन’ ही अभिनव सेवा सुरू केली जात आहे. यामुळे आता चाकरमानी स्वतः प्रवास करताना आपली कार थेट रेल्वेने कोकणात किंवा गोव्यात घेऊन जाऊ शकणार आहेत. कोकण रेल्वेच्या या घोषणेमुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

गेली अनेक वर्षे मालाने भरलेले ट्रक रेल्वे वॅगनवरून वाहून नेणारी ‌‘रो-रो’ सेवा यशस्वी ठरली आहे. याच धर्तीवर आता खासगी चारचाकी वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास कार चालवण्याच्या त्रासाशिवाय अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आनंददायी होणार आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या गर्दीत हा पर्याय अत्यंत सोयीचा ठरणार आहे. ही सेवा येत्या 23 ऑगस्टपासून सुरू होणार असून, यासाठीचे आरक्षण 21 जुलैपासून खुले होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी खऱ्या अर्थाने चिंतामुक्त प्रवासाचा अनुभव देणारा ठरणार आहे.

ही सेवा रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा या स्थानकांदरम्यान असेल. कारसोबत केवळ तीन व्यक्तींना प्रवासाची परवानगी असेल. एस.एल.आर. किंवा तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्याचे तिकीट काढावे लागेल. या सेवेची सुरुवात कोलाड (महाराष्ट्र) येथून 23 ऑगस्टपासून तर वेर्णा (गोवा) येथून 24 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तसेच, 7 हजार 875 रुपयांच्या शुल्कासह कारसोबत तिघांना एसी कोच अगर एसएलआर डब्यातून प्रवास करता येणार.

Exit mobile version